पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्य, देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. गेल्या सात वर्षांपासून शाळेतर्फे या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत असून यंदाही हजाराहून अधिक विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विस्तार, चिखली-मोशी येथून सुरू झालेली ही रॅली शाळेपर्यंत काढण्यात आली. रॅलीमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपआयुक्त अण्णा बोदडे, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवडचे अधिकारी इन्स्पेक्टर विजय महाजन, सागर गुरव तसेच मोटार वाहन निरीक्षक पल्लवी रसIळ यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, श्री. प्रशांत पाटील, चेअरमन – प्रचिती ग्रुप ऑफ स्कूल्स, शाळेचे संचालक, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले.

रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेच्या गणवेशात सहभागी झालेले विद्यार्थी. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात तिरंगा ध्वज असून संपूर्ण परिसर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेला.
रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि राष्ट्रनिर्मितीतील महान व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. काही विद्यार्थी नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, मदर तेरेसा, भारत माता, राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.

देशभक्तीपर गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी लेझीम आणि लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर केले. या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. हातात डौलाने फडकणारे तिरंगे, देशभक्तीपर घोषणा, पारंपरिक कला आणि स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषेमुळे रॅलीला विशेष देशभक्तीमय वातावरण प्राप्त झाले.

या तिरंगा रॅलीमध्ये एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातातील तिरंग्यामुळे रॅलीचा मार्ग तिरंग्याच्या रंगांनी आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने भारावून गेला. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेतर्फे गेल्या सात वर्षांपासून तिरंगा रॅलीची परंपरा जपली जात आहे. यंदाच्या रॅलीलाही विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




















Join Our Whatsapp Group