पिंपरी (Pclive7.com):- नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि तत्पर पोलीस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सांगवी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) कार्यालयाचे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.६ ऑगस्ट) फीत कापून व फलक अनावरण करून करण्यात आले.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सांगवी विभागाच्या कार्यालयाच्या वाढत्या कामकाजाच्या गरजेनुसार नव्या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना आयुक्त चौबे यांनी नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा देण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्य करावे, असे निर्देश दिले.

नवीन कार्यालयातील आधुनिक सुविधा, सुयोग्य कार्यालयीन वातावरण आणि अद्ययावत कार्यपद्धतीमुळे नागरिकांना अधिक प्रभावी सेवा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत बोराटे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) रामनाथ पोकळे, विविध विभागांचे पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच सांगवी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. नवीन कार्यालयामुळे सांगवी विभागातील नागरिकांना पोलीस सेवांचा अधिक वेगवान आणि प्रभावी लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.




















Join Our Whatsapp Group