पिंपरी (Pclive7.com):- अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत चिखली परिसरात एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे ७ लाख ३८ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास हरगुडे वस्ती ते स्पाईन रोडकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर संशयितांची हालचाल आढळून आली. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत आरोपींकडून ७३ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ, एक चारचाकी वाहन, एक दुचाकी, मोबाईल फोन तसेच रोख रक्कम असा एकूण ७ लाख ३८ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समशुद राजाबली शहा (वय २३, हरगुडेवस्ती), साहबन मोहम्मद इलियास शहा (वय २१, प्रथमेश पार्क, कुदळवाडी), सोहेल कादिर शेख (वय २९, पिंपळे गुरव), अभिराज जोखुराम कोरी (वय ३३, हरगुडेवस्ती) यांचा समावेश आहे. तर हर्ष यादव (केडीसी, मुंबई) याचा शोध पोलिस घेत आहेत.

प्राथमिक तपासात आरोपी एमडी अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री व वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधातील मोहिम अधिक तीव्र करत अशा बेकायदेशीर कारवायांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.





















Join Our Whatsapp Group