रावेत (Pclive7.com):- रावेत येथील सिटी प्राईड स्कूल आणि लगतच्या निवासी परिसरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत परिसरात कुत्र्यांनी चिमुकल्यांवर हल्ला करून चावल्याच्या घटना घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत मुख्य रस्ते, अंतर्गत गल्ल्या तसेच शाळेजवळील परिसरात भटक्या कुत्र्यांचे टोळके दिसून येतात. अनेक वेळा हे कुत्रे पादचारी, विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांच्या अंगावर धावत असल्याने अपघाताचा तसेच जखमी होण्याचा धोका वाढला आहे.

अलीकडेच काही विद्यार्थ्यांवर कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केल्याच्या घटनांमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे लहान मुलांना एकटे शाळेत पाठविण्यास अनेक पालक धजावत नसल्याचे चित्र आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “शाळेत जाणाऱ्या मुलांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास एखादी गंभीर घटना घडू शकते,” अशी प्रतिक्रिया परिसरातील रहिवाशांनी दिली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व पशुवैद्यकीय विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन परिसरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीजविरोधी लसीकरण मोहीम राबवावी, तसेच आक्रमक कुत्र्यांना पकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत लवकरात लवकर ठोस कारवाई न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा परिसरातील पालक आणि रहिवाशांनी दिला आहे.





















Join Our Whatsapp Group