
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि महापालिकेचा संयुक्त उपक्रम; प्रदर्शन ९ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांसाठी खुले
पिंपरी (Pclive7.com):- एखाद्या क्षणाला कॅमेऱ्यात बंदिस्त करणारी एक ‘क्लिक’ किती व्यापक आशय व्यक्त करू शकते, किती प्रश्न उपस्थित करू शकते आणि विचार करायला भाग पाडू शकते, याची प्रचिती पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वृत्तपत्र छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनातून येत आहे. ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते शनिवारी (दि.३) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या कलादालनात या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन ९ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वर्तमानपत्रांच्या छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या विविध घटनांचे, माणसांच्या भावविश्वाचे, सामाजिक वास्तवाचे आणि शहराच्या बदलत्या स्वरूपाचे दर्शन या प्रदर्शनातून घडते. बातमीच्या पलीकडे जाऊन छायाचित्रांमधून व्यक्त होणारा आशय आणि त्यामागील छायाचित्रकारांची निरीक्षणशक्ती हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
उद्घाटनानंतर हृदयनाथ मंगेशकर यांनी प्रदर्शनातील छायाचित्रांची पाहणी केली. प्रत्येक छायाचित्रामागील आशय आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना यांचे त्यांनी कौतुक केले. छायाचित्रकारांना विशेष शुभेच्छा देत त्यांच्या कामाला प्रोत्साहन दिले. एखाद्या क्षणाचे छायाचित्रण केवळ दृश्य टिपण्यापुरते मर्यादित नसते, तर त्या दृश्यातून अनेक अर्थ उलगडत असतात, याची जाणीव या प्रदर्शनातून होते.

या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रम बगाडे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोर बरकले, कार्यकारिणी सदस्य मिलिंद शुक्ल, महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते. पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य तुषार झरेकर यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील वृत्तपत्र छायाचित्रकार आणि पत्रकारांनी विशेष मेहनत घेतली. छायाचित्रांची निवड, प्रदर्शनाची मांडणी आणि आयोजनासाठी त्यांनी पुढाकार घेतला. रोजच्या बातम्यांच्या धावपळीत समाजाचे वास्तव टिपणाऱ्या छायाचित्रकारांच्या कलात्मक दृष्टिकोनाला व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कामाची दखल नागरिकांनी घ्यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
हे प्रदर्शन ९ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार असून, छायाचित्रांच्या माध्यमातून शहराचा वेध घेण्याची आणि पत्रकारांच्या नजरेतून समाजाचे विविध पैलू अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.


















Join Our Whatsapp Group