चिंचवड (Pclive7.com):- औद्योगिक क्रीडा संघटनेच्या वतीने आयोजित ६३वी कॅरम स्पर्धा रविवारी चिंचवड येथील एसकेएफ बेअरिंग इंडिया एम्प्लॉइज युनियन हॉलमध्ये उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन एसकेएफ इंडिया, चिंचवड यांनी केले होते. स्पर्धेत एसकेएफ, पीसीएमसी, बजाज ऑटो, जेसीबी इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, टीसीएस, टेक महिंद्रा, सँडविक एशिया, भारत फोर्ज, इन्फोसिस, टेट्रापॅक, थरमॅक्स, मर्सिडीजसह विविध ४७ नामांकित कंपन्यांतील एकूण २२९ पुरुष व महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी आणि महिला दुहेरी अशा चार गटांत घेण्यात आली. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच औद्योगिक क्रीडा संघटनेतर्फे कामगार क्षेत्रातून निवृत्त झालेल्या कर्मचारी व कामगारांसाठी स्वतंत्र गटाची स्पर्धा आयोजित करण्यात आली.
पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रारंभी प्रदीप वाघ यांनी प्रास्ताविक केले, तर नरेंद्र कदम यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. सचिव वसंत ठोंबरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. पारितोषिकांचे वितरण वसंत ठोंबरे, नरेंद्र कदम, संतोष शिंदे, विजय हिंगे, मंदार कुलकर्णी, अंकित दौंड आणि नितीन कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संतोष सोनटक्के, हरी देशपांडे, अमित कदम, अतुल काळोखे, दयानंद नरवडे, दत्ता गायकवाड, मिनार गजने, सचिन कांबळे, किरण कंक, मेनिनो कार्डोझ, दुष्यंत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वाघ यांनी केले, तर आभार हरी देशपांडे यांनी मानले. स्पर्धेचे यूट्यूब प्रक्षेपण मंदार कुलकर्णी यांनी केले.

स्पर्धेतील प्रमुख विजेते :
निवृत्त कर्मचारी एकेरी गट :
विजेता : सूर्यकांत केसरकर
उपविजेता : गिरीश जोशी
महिला एकेरी गट :
विजेती : निशा पाटील (टेट्रापॅक)
उपविजेती : स्मिता घाग (सँडविक एशिया)
महिला दुहेरी गट :
विजेत्या : निशा पाटील व निशा राठी (टेट्रापॅक)
उपविजेत्या : सुकन्या भावसार व श्रुतिका जाधव (प्राज इंडस्ट्रीज)
पुरुष एकेरी गट :
विजेता : नौशाद शहा (टीसीएस)
उपविजेता : मनोज भोसले (टाटा मोटर्स)
पुरुष दुहेरी गट :
विजेते : शशी गायकवाड व मनोज भोसले (टाटा मोटर्स)
उपविजेते : सचिन बांदल व संजय थिटे (टाटा मोटर्स)
उत्कृष्ट नियोजन, मोठ्या प्रमाणातील सहभाग आणि चुरशीच्या लढतींमुळे यंदाची ६३वी कॅरम स्पर्धा यशस्वी ठरली. औद्योगिक क्षेत्रातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी या स्पर्धेने प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.



















Join Our Whatsapp Group