पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गरव येथील सृष्टी चौक परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, तब्बल सात मजली इमारत उभी राहेपर्यंत महापालिका प्रशासनाचे लक्ष कुठे होते?, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

बांधकाम सुरू असतानाच बीट निरीक्षक, संबंधित अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास हे बांधकाम आले नव्हते का? संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे.
शहरात अनधिकृत बांधकामे सुरू असताना सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? बांधकाम मोठ्या आकारात उभे राहिल्यानंतर नोटिसा बजावणे आणि पाडकामाची कारवाई करणे, अशीच कार्यपद्धती आहे का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या प्रकरणात कोणत्याही अधिकाऱ्यावर गैरप्रकाराचा आरोप सिद्ध झालेला नसून, नागरिकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची चौकशी होणे आवश्यक आहे.

दरम्यान, संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. काही मोठ्या बांधकामांवर कारवाई होत नसल्याने महापालिकेच्या कारवाईच्या पद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. बांधकाम सुरू होत असतानाच कारवाई का केली नाही? संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का? याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. त्यांची बाजू समोर आल्यानंतर या प्रकरणाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.


















Join Our Whatsapp Group