संबंधितांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याची नगरसेवक विनोद नढे यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागात ‘शालार्थ प्रणाली’चा गैरवापर करून मयत, सेवानिवृत्त तसेच आस्थापना बदली झालेल्या २५ हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नावावर बोगस वेतन काढून कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विनोद नढे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई, निलंबन आणि आर्थिक वसुलीची मागणी केली आहे.

विनोद नढे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून शालार्थ प्रणालीचा गैरवापर केला. मयत, सेवानिवृत्त आणि इतर विभागांत बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बंद न करता त्यांच्या नावावर वेतन देयके तयार करण्यात आली. या माध्यमातून शासन व महापालिकेच्या सुमारे ५ ते ८ कोटी रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनात फुगेवाडी येथील दिवंगत लिपिक चंद्रशेखर गैंगले यांच्या नावावर मृत्यूनंतरही वेतन काढण्यात आल्याचा तसेच २०२१ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक हनुमंत मारणे यांच्या नावावरही नियमबाह्य पद्धतीने वेतन देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, शिक्षण विभागातून इतर विभागांत बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन संबंधित विभागांतून सुरू असतानाही शालार्थ प्रणालीतील वेतन बंद न केल्याने दुहेरी वेतन काढण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा दावा नढे यांनी केला आहे.
दरम्यान, २०१८ पासून आजतागायतच्या सर्व शालार्थ पे-बिलांची आणि सेवा नोंदींची स्वतंत्र विशेष पथकामार्फत फॉरेन्सिक तपासणी करावी, संबंधित शालार्थ आयडी तात्काळ गोठवावेत, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) गुन्हे दाखल करावेत, तसेच झालेल्या आर्थिक नुकसानीची १८ टक्के व्याजासह वसुली करावी, अशी मागणी नढे यांनी केली आहे. सदर प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


















Join Our Whatsapp Group