आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराला पदाधिकारी-कार्यकर्त्यांची साथ; सेवा संकल्प अभियानांतर्गत रक्तदान, आरोग्य शिबिर आणि नशामुक्तीच्या प्रतिज्ञेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी (Pclive7.com):- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला विश्वविक्रमी ढोल-ताशा मानवंदना देण्यासाठी आयोजित सोहळ्यात आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नशामुक्त भारताची सामूहिक प्रतिज्ञा, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गोसेवा अभियानाची जनजागृती आणि भारतमातेचे रांगोळी रेखाटन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिक आणि शिव-शंभूप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून रविवारी, दि. ४ ऑक्टोबर रोजी आयोजित सोहळ्यात हजारो वादक आणि नागरिक सहभागी झाले. शिव-शंभूंच्या शौर्याला मानवंदना देतानाच त्यांच्या विचारांची प्रेरणा समाजहिताच्या कृतीतून पुढे नेण्यावर भर देण्यात आला. सांस्कृतिक परंपरा जपण्यासोबत नागरिकांचे आरोग्य, युवा पिढीची व्यसनमुक्ती आणि सेवाभावाची जागृती यांना या उपक्रमांतून प्राधान्य देण्यात आले, अशी माहिती सरचिटणीस विकास डोळस आणि संजय पटनी यांनी दिली.

भाजपाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सेवाभावाच्या प्रेरणेतून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या संघटनात्मक मार्गदर्शनाच्या भावनेतून समाजसेवेचे उपक्रम पुढे नेण्याचा संदेश या सोहळ्यात देण्यात आला.
रक्तदान शिबिराला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती करण्यात आली. या उपक्रमांसाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी योगदान दिले. आमदार लांडगे यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक सोहळ्यासोबत लोकसेवेचे उपक्रम राबविल्यामुळे नागरिकांना सहभागी होण्याची संधी मिळाली, असे सरचिटणीस पटनी यांनी नमूद केले.

“शिव-शंभूंच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजासाठी प्रत्यक्ष काम करणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. विश्वविक्रमी ढोल-ताशा मानवंदना सोहळ्यात आपल्या संस्कृतीची ताकद अनुभवली; त्याचबरोबर रक्तदान, आरोग्य शिबिर, नशामुक्तीची प्रतिज्ञा आणि गोसेवा जनजागृतीतून नागरिकांचा सेवाभावही दिसून आला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सेवाभावाच्या प्रेरणेतून, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता समाजाशी असलेली बांधिलकी जपत आहे. पक्ष संघटनेची ताकद पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण जनसेवेत आहे. नागरिकांच्या गरजा समजून घेणे, त्यांच्या मदतीला धावून जाणे आणि समाजहिताच्या उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून घेणे, या भावनेने आपण काम करीत आहोत.या सोहळ्यात योगदान देणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, रक्तदाते, डॉक्टर, कलाकार, वादक आणि नागरिकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. युवा पिढी व्यसनमुक्त राहावी, प्रत्येक कुटुंब आरोग्याबाबत जागरूक व्हावे आणि समाजात परस्पर सहकार्याची भावना वाढावी, यासाठी आपण एकत्र प्रयत्न करूया. शिव-शंभूंचा सांस्कृतिक वारसा जपताना समाजसेवेचा हा संकल्पही सातत्याने पुढे नेऊया!”
– महेश लांडगे, आमदार तथा अध्यक्ष, हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट.


















Join Our Whatsapp Group