पिंपरी (Pclive7.com):- अभिजात मराठी भाषेची समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा नागरिकांसमोर आणण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सप्ताहाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात संतोष पवार लिखित आणि दिग्दर्शित ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ आणि सायंकाळच्या सत्रात क्षितिज पटवर्धन लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या दोन वैविध्यपूर्ण नाटकांचे सादरीकरण झाले. हास्यविनोदापासून सामाजिक आणि वैचारिक आशयापर्यंत मराठी रंगभूमीचे विविध पैलू या दोन्ही नाटकांतून रसिकांना अनुभवता आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली दि. ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीशी नागरिकांचा संवाद अधिक दृढ व्हावा, यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारच्या सत्रात सादर झालेल्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या संतोष पवार लिखित व दिग्दर्शित नाटकातून दोन कुटुंबांमधील नातेसंबंध, प्रेम आणि लग्नाच्या गडबडीतून निर्माण होणारा विनोद रंगमंचावर खुलला. पात्रांच्या वेगवेगळ्या शारीरिक अडचणी आणि वैशिष्ट्यांमधून निर्माण होणारे गैरसमज, प्रसंग आणि संवाद यामुळे नाटकाला धमाल विनोदाची रंगत लाभली. कुटुंबातील व्यक्तींच्या उणिवा स्वीकारत त्यांच्यातील प्रेम आणि आपलेपणा जपण्याचा संदेश देत या नाटकाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
यानंतर सादर झालेल्या ‘भूमिका’ या गाजलेल्या नाटकाने रंगमंचाला गंभीर आणि वैचारिक वळण दिले. क्षितिज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकात ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांच्या प्रभावी अभिनयाने रसिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. एका अभिनेत्याला साकाराव्या लागणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिकेच्या माध्यमातून त्याच्या वैयक्तिक आयुष्यात, विचारांमध्ये आणि नातेसंबंधांमध्ये होणारा बदल या नाटकातून मांडण्यात आला आहे.

‘भूमिका’ हे केवळ रंगमंचावरची व्यक्तिरेखा साकारण्यापुरते मर्यादित न राहता, प्रत्येक व्यक्तीची समाजाप्रती आणि स्वतःच्या मूल्यांप्रती असलेली भूमिका काय असावी, याचा विचार करण्यास भाग पाडणारे नाटक आहे. सामाजिक समता, अस्मिता, संविधानिक मूल्ये आणि मानवी नातेसंबंध यांसारख्या विषयांना वैयक्तिक आणि कौटुंबिक संघर्षाच्या माध्यमातून मांडण्यात आल्याने नाटकाला वैचारिक खोली प्राप्त झाली. सचिन खेडेकर यांच्यासह कलाकारांच्या प्रभावी अभिनयाला आणि नाटकाच्या आशयाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
दुपारच्या सत्रातील विनोदी रंगत आणि सायंकाळच्या सत्रातील गंभीर वैचारिक मांडणी अशा दोन्ही भिन्न अनुभवांनी आजचा दिवस मराठी रंगभूमीच्या विविधतेचा परिचय करून देणारा ठरला. दोन्ही नाटकांच्या प्रयोगांना प्रेक्षागृहात नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. हास्य, मनोरंजन, सामाजिक भान आणि वैचारिक चिंतन यांचा अनुभव देणाऱ्या या दोन्ही नाटकांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रात्रीच्या सत्रात ‘सणयात्रा’तून उलगडला मराठी सण-परंपरेचा सांस्कृतिक प्रवास..
लोकजागर ऍक्टिव्हिटीजच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘सणयात्रा’ या कार्यक्रमातून मराठी पंचांगानुसार येणाऱ्या विविध सणांची वैशिष्ट्ये, त्यामागील परंपरा आणि त्यांच्याशी जोडलेल्या कथा रसिकांसमोर उलगडण्यात आल्या. महाराष्ट्राच्या समृद्ध सणपरंपरेचा सांस्कृतिक वारसा सांगत, प्रत्येक सणाशी संबंधित परंपरा आणि त्यामागील कथांना नृत्य व संगीताची सुरेल साथ देण्यात आली. माहिती, परंपरा, नृत्य आणि संगीत यांची सांगड घालत सादर झालेल्या या कार्यक्रमातून मराठी संस्कृतीतील सणांचे विविध रंग आणि त्यामागची सांस्कृतिक समृद्धी अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली.
बुधवार, दि.७ ऑक्टोबर रोजी होणारे विविध कार्यक्रम..
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
दुपारी १२.३० वाजता – ‘फोक लावणी’ ( प्रवेश केवळ महिलांसाठी)
सायंकाळी ५.३० वाजता- भाऊ कदम अभिनीत ‘पहिली लग्नाची दुसरी प्रेमाची’ हे विनोदी नाटक
रात्री ९.३० वाजता : ‘स्वर मराठी मनाचा’ हा स्वरमयी प्रवास
नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, सांगवी..
दुपारी १२.३० वाजता – ‘लावण्यरंग’ हा ठसकेबाज लावणी कार्यक्रम ( प्रवेश केवळ महिलांसाठी)
सायंकाळी ५ वाजता – मराठी गझल व भावगीतांचा ‘गझलभाव’ कार्यक्रम,
रात्री ८ वाजता – स्वप्नील जोशी आणि विदुला चौगुले अभिनीत ‘लग्नपंचमी’ नाटक
आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी..
सकाळी १० वाजता – स्थानिक कवींचे कवी संमेलन
दुपारी १२.३० वाजता – स्थानिक कलाकारांचा सहभाग असणारा ‘गंध मराठी कलेचा’ कार्यक्रम
दुपारी ३ वाजता – ‘मराठी साहित्याचे विश्व’ या विषयावरील चर्चासत्र
सायंकाळी ५.३० वाजता – शाहिर प्रकाश ढवळे आणि सहकाऱ्यांचा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम.
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह (छोटे सभागृह), आकुर्डी..
सकाळी ९ वाजता – महापालिका शाळांअंतर्गत समूह नृत्य स्पर्धा
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह (मोठे सभागृह), आकुर्डी
सायंकाळी ७ वाजता – सुप्रसिद्ध लोकगायक नंदेश विठ्ठल उमप यांचा भव्य लोककला सोहळा – ‘मी मराठी’

















Join Our Whatsapp Group