पिंपरी (Pclive7.com):- उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अपहरणाच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत यवतमाळ येथून आठ आरोपींना अटक केली असून अपहृत राजेश बाळू चव्हाण यांची सुखरूप सुटका केली आहे. ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांच्या वादातून हे अपहरण करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घाटेवस्ती, आंबेठाण येथून तीन रिक्षांमधून आलेल्या काही इसमांनी राजेश चव्हाण यांचे त्यांच्या मोटारसायकलसह अपहरण केले. याप्रकरणी सुषमा राजेश चव्हाण (वय ३०) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अपहरणासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान अमोल रामराव राठोड, सचिन रामराव राठोड आणि निलेश संतोष राठोड या तिघांना शिक्रापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून संदीप गुलाब राठोड याच्यासह एकूण आठ जणांनी मिळून राजेश चव्हाण यांचे अपहरण केल्याची कबुली दिली. आरोपींनी राजेश चव्हाण यांना आंबेठाण येथून जबरदस्तीने तीन रिक्षांमधून यवतमाळ जिल्ह्यात नेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीसांनी तातडीने यवतमाळ जिल्ह्यातील दिंडाळा व परिसरात शोधमोहीम राबवत उर्वरित आरोपींना अटक केली. तसेच अपहृत राजेश चव्हाण यांची गुन्हा घडल्यापासून २४ तासांच्या आत सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले.

अटक आरोपी..
अमोल रामराव राठोड (२९)
सचिन रामराव राठोड (२५)
निलेश संतोष राठोड (२७)
शुभम प्रल्हाद जाधव (२५)
संदीप गुलाब राठोड (४२)
इंदल थावरा जाधव (४०)
राजू बापुराव चव्हाण (४४)
संदीप उदयभान जाधव (३२)
हे सर्व आरोपी यवतमाळ व संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
पोलीसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली ह्युंदाई वेन्यू कार, तीन ऑटो रिक्षा आणि अपहृताची शाईन मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन दिगंबर सुर्यवशी, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सहायक पोलीस फौजदार यदु आढारी, पोलीस हवालदार विठ्ठल वडेकर, अनिल गोरड, भैरोबा यादव, संतोष काळे, पोलीस शिपाई बापुराव सोनपसारे, गणेश गायकवाड, मंगेश कदम, संतोष वायकर, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, मंगेश घोलप, साहिल सांडभारे, समीर महात यांनी केली आहे.

















Join Our Whatsapp Group