पिंपरी (Pclive7.com):- जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पिंपरी गावामध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. टाळ-मृदंगाचा गजर, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने आणि विठ्ठलनामाच्या अखंड घोषाने संपूर्ण पिंपरी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

पिंपरी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात नगरसेवक संदीप वाघेरे व पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक, वारकरी, भाविक आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर नगरसेविका प्रियंका कुदळे, निकिता कदम, विविध भजनी मंडळे, धार्मिक व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालखीचे दर्शन घेत भाविकांचे स्वागत केले. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाच्या गजरामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकाला जणू भक्तीच्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची विशेष व्यवस्था
पालखी सोबत परतीच्या प्रवासात मार्गक्रमण करणाऱ्या हजारो भाविक-वारकऱ्यांसाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दूरवरून आलेल्या वारकऱ्यांनी या सेवाकार्याचा लाभ घेतला. नागरिक आणि स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वाटप करीत वारकऱ्यांची सेवा केली.

‘वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा’
यावेळी बोलताना नगरसेवक संदीप वाघेरे यांनी, “संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरीत स्वागत करण्याचा हा क्षण प्रत्येक पिंपरीकरासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी बांधवांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून यापुढेही अशाच प्रकारे सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू,” अशी भावना व्यक्त केली.
पालखीच्या स्वागतासाठी परिसरात करण्यात आलेली सजावट, स्वागत कमानी, पुष्पवृष्टी, भक्तिगीते आणि विविध भजनी मंडळांच्या सादरीकरणामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते. पालखी मार्गावर नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत विठ्ठलनामाचा जयघोष केला. ‘तुका म्हणे धावा विठ्ठलाच्या नामी’च्या भक्तिभावात पिंपरी दुमदुमले असून, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामुळे पिंपरीच्या भूमीत भक्ती, सेवा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.





















Join Our Whatsapp Group