पिंपरी (Pclive7.com):- कर्जाच्या हप्त्यांच्या वादातून टीव्हीएस क्रेडिटच्या रिकव्हरी एजंटने तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना डांगे चौक परिसरात घडली. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद कैलास सावंत (वय २५, व्यवसाय – सिक्युरिटी गार्ड, रा. वाघेरे कॉलनी क्र. ३, पिंपरी गाव) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार सुभाष पुरोहित (वय ३२, व्यवसाय – टीव्हीएस क्रेडिट लोन रिकव्हरी एजंट, रा. काळेवाडी, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गुरुवारी (दि.१२ मार्च) रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास वाकड येथील डांगे चौक परिसरातील सत्यम बारसमोरील रस्त्यावर घडली. फिर्यादी प्रमोद सावंत आणि त्यांचा मित्र रमन द्विवेदी (वय २२) हे दोघे तेथे उभे राहून गप्पा मारत असताना आरोपी तेथे आला. आरोपीने फिर्यादीला “माझा फोन का उचलत नाहीस? तुझे लोनचे हप्ते बाकी आहेत, पैसे कधी देणार?” असे म्हणत पैशांची मागणी केली. त्यानंतर शिवीगाळ करत आरोपीने सावंत यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच हातातील कड्याने त्यांच्या डोक्यावर वार करून जखमी केले, असे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, सावंत यांचा मित्र रमन द्विवेदी हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला असता आरोपीने त्यालाही धक्का दिला. तसेच सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देत आरोपी तेथून पळून गेला. या घटनेप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ आणि ३५१ (२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मुंडकर करत आहेत. आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.






















Join Our Whatsapp Group