पिंपरी (Pclive7.com):- दिघी परिसरातील गंगोत्री हॉस्पिटलजवळ राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. अथर्व विजय देशमुख असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हा गंगोत्री हॉस्पिटल परिसरात पार्वती भोजने यांच्या घरी भाड्याने राहत होता. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्याने राहत्या घरात सीट बेल्टच्या सहाय्याने गळफास घेतला. घटना घडली तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. अथर्वने बराच वेळ प्रतिसाद न दिल्याने त्याची आई ज्योती देशमुख आणि शेजाऱ्यांनी खिडकीतून घराची कडी उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर अथर्वला खाली उतरवून तातडीने जवळच्या गंगोत्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी दिघी पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन केले आहे. अथर्वच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आत्महत्येपूर्वी त्याने आपला मोबाईल फोन फॉरमॅट केल्याची माहिती समोर आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group