चाकण (Pclive7.com):- पुणे जिल्ह्यातील चाकण येथे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ३२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास आंबेठाण चौक परिसरात घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शोभा विजय वाघमारे असे मृत महिलेचे नाव असून त्या सध्या चाकण परिसरात वास्तव्यास होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री शोभा वाघमारे या आंबेठाण चौकातील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात असताना सहा ते सात भटक्या कुत्र्यांनी त्यांना घेरले. अचानक झालेल्या या हल्ल्यात कुत्र्यांनी त्यांच्यावर झडप घातली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, शोभा यांनी दगड उचलून कुत्र्यांना पळवून लावण्याचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांच्या झुंडीसमोर त्यांचा निभाव लागला नाही.
कुत्र्यांनी त्यांच्या हात, पाय, तोंड आणि मानेवर गंभीर चावे घेतल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या भीषण हल्ल्यात अवघ्या १५ मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात सुरुवातीला खून किंवा अत्याचाराचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर कुत्र्यांच्या हल्ल्यामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, चाकण औद्योगिक वसाहत आणि शहर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.





















Join Our Whatsapp Group