पिंपरी (Pclive7.com):- सांगवीतील स्मशानभूमीचे काम एक ते दीड वर्षापासून संथ गतीने चालू आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना या स्मशानभूमीच्या जुन्या कामातून मलई मिळत नाही, म्हणून त्यांच्याकडून काम करु दिले जात नाही. अधिका-यांना चौकशा, निलंबन करु, बदली केली जाईल, अशी धमकी दिली जात असल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केला.
स्मशानभूमीत भाजपाच्या काही नगरसेवकांना ‘मलई’ दिसत असल्यानेच दीड वर्ष काम पूर्ण झाले नाही. हेच नगरसेवक राष्ट्रवादीने काम अडविले म्हणून ‘बोंब’ मारत आहेत. भाजपला काम करत येत नसून नवीन लोकांना मलई खाण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. सांगवी स्मशानभूमीची जागा मालकांनी अडवणूक न करता रितसर मोबदला देण्याची मागणी केली. तथापि, भाजप नगरसेवकांकडून स्वत:ला मलई मिळावी म्हणून कामाशी संबंधित सगळ्यांना ब्लॅकमेल करुन धमकाविले जात आहे.
स्मशानभूमीचे नियोजन व प्रत्यक्ष काम २०१६ मध्येच चालू झाले. त्यावेळी जागा मालकांना विश्वास दिला होता. परंतु, २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत मलई आवडणारेच निवडून आल्याने विकास करणे दूरच पण चालू असणारे कामही व्यवस्थित करता येत नाही. सत्ताधा-यांचे मोठे पदाधिकारी या परिसरात असूनही नगरसेवकांच्या भ्रष्टाचारावर त्यांचा अंकुश नाही. आयुक्तही या कामास जबाबदर आहेत. त्यासाठी महासभेत संपादित करण्याची मान्यता व्हावी आणि तातडीने स्मशानभूमीचे काम चालू करावे, अशी मागणी शितोळे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.