मुंबई (Pclive7.com):- सरकारला पेट्रोल–डिझेलचे दर स्थिर ठेवून जनतेला जगण्याचे स्थैर्य देणे शक्य दिसत नाही. त्यातच पेट्रोल पंपांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावण्याची सक्ती होत आहे. या ‘फोटोसेशन’पेक्षा पेट्रोल पंपांवर ‘पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत’ असे फलक कसे लागतील हे पहा, अन्यथा मोदींच्या फोटोसोबत त्यांच्या कारकीर्दीतील पेट्रोल–डिझेलच्या वाढत्या दरांचाही फलक लावा, अशी टीका शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सामनातून केली आहे.
शिवसेना भाजप तसेच पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. पेट्रोल पंपांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावण्याची सक्ती करण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणं सांगून दरवाढ केली जात आहे. अच्छे दिन राहिले बाजूला किमान जगण्याचे स्थैर्य तरी सामान्य माणसाला लाभू द्या, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.
काय टीका केली आहे सामनामध्ये…
काही महिन्यांपूर्वी पेट्रोल असेच ८५ रुपये प्रतिलिटर एवढे महागले होते. नंतर ते काही पैशांनी स्वस्त झाले. मात्र हा ‘आनंद’देखील सामान्य जनतेला फार दिवस मिळाला नाही. पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त करण्याची, त्याला जीएसटीच्या कक्षेत घेण्याची मागणी झाली की कारणे सांगून स्वतःचे ‘कर्तव्य’ लपवायचे असाच कारभार सुरू आहे. महाराष्ट्रात आधीच्या शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर पाचही वर्षे स्थिर होते. सरकारने ठरवले म्हणून ते शक्य झाले होते.