पिंपरी (प्रतिनिधी): खंडणीसाठी अपहरण करून तसेच कोयत्याचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पवन छगन उजगरे आणि सुमित हनुमंत कराड अशी आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून दोन रिक्षा, दोन कोयते, मोबाईल फोन तसेच काही रोख रक्कम असा एकूण ५ लाख १६ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींना अटक केल्यानंतर भोसरी आणि सांगवी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल झाली असून, आरोपींनी आणखी काही गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदरची कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस उपनिरीक्षक अमर राऊत, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल कानगुडे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, चंद्रकांत जाधव, किशोर कांबळे, दादाभाऊ साबळे, भरत गाडे यांचे पथकाने केली आहे.






















Join Our Whatsapp Group