पिंपरी (Pclive7.com):- ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून रहाटणी येथील एका व्यक्तीची तब्बल ५१ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

काळेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या रहाटणी येथील राहत्या घरी असताना आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. ‘सर्कल ऑफ इन्साइट’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून stocks.cora-pro.com या संकेतस्थळाची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या साईटवर खाते उघडण्यास सांगून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले.
आरोपींनी वेळोवेळी वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगत फिर्यादींकडून विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करून घेतले. अधिक नफा दाखवून विश्वास संपादन करत अखेरीस एकूण ५१ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
ही घटना १ सप्टेंबर २०२५ ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान रहाटणी परिसरात घडली. याप्रकरणी १६ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी अटकेत नसून पोलीस निरीक्षक (गुन्हे) धुमाळ हे पुढील तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group