पिंपरी (Pclive7.com):- IIEBM Indus Business School, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या “रणभूमी २०२६” या भव्य आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाचा यशस्वी समारोप उत्साहात पार पडला. क्रीडास्पर्धा, रणनीती आणि जिद्दीचा उत्कृष्ट संगम या स्पर्धेत पाहायला मिळाला.

IIEBM इंडस बिझनेस स्कूलद्वारे आयोजित या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाला KTM, Triumph (बी. यू. भंडारी) आणि Satyam Corporate Caterers यांचे विशेष सहकार्य लाभले. एकूण २४ प्रायोजकांनी या स्पर्धेला पाठिंबा दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली परंपरेचा तसेच मराठ्यांनी उभारलेल्या आणि जिंकलेल्या किल्ल्यांच्या इतिहासाचा रणभूमी दरम्यान उत्सव साजरा करण्यात आला. हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा आणि त्यांच्या परंपरेला पुढे नेण्याचा एक प्रयत्न होता. सामर्थ्य, कौशल्य आणि रणनीती यांचा क्रीडामाध्यमातून सराव करून ही परंपरा जपण्याचा संदेश देण्यात आला. नगरसेवक राहुल कलाटे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात क्रीडेला अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याचे नमूद केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली गेली पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला. यावेळी व्यवस्थापकीय संचालक डॉ.जयसिंग मारवाह, अधिष्ठाता डॉ.पूनम निकम, संचालक प्रशासन कर्नल रविंद्र कुमार, संचालक राजीव सिंग, क्रीडा समिती प्रमुख, प्रा.सदानंद पेटकर, सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी विध्यार्थी यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत बुद्धिबळ, ४ बाय १०० रिले, व्हॉलीबॉल आणि सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट अशा चार प्रमुख क्रीडा प्रकारांचा समावेश होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ४० हून अधिक महाविद्यालयांमधील ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ४५ हून अधिक संघांच्या सहभागामुळे या स्पर्धेला भव्य स्वरूप प्राप्त झाले.
रणभूमी २०२६ मधील विजेते व उपविजेते संघ
क्रिकेट – विजेता संघ: कोरीगड | उपविजेता: पन्हाळा
व्हॉलीबॉल – विजेता संघ: रायगड | उपविजेता: रांगणा
रिले (महिला) – विजेता संघ: राजगड | उपविजेता: लिंगाणा
रिले (पुरुष) – विजेता संघ: राजगड | उपविजेता: जंजिरा
बुद्धिबळ – विजेता संघ: भैरवगड | उपविजेता: भैरवगड
IIEBM कॅम्पसमध्ये आयोजित या महोत्सवाची सुरुवात उत्साहपूर्ण उद्घाटन सोहळ्याने झाली. “जिथे जिद्द आणि यश एकत्र येते” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळभावना, नेतृत्वगुण आणि संघभावना प्रदर्शित केली. स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी खेळाडूंनी उत्कटता, रणनीती आणि समन्वयाचे दर्शन घडवले. “Where Grit Meets Glory” या थीमला साजेसा हा क्रीडा महोत्सव ठरला. केवळ विजय नव्हे, तर सहभाग, चिकाटी आणि मैत्री या मूल्यांचाही उत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण कॅम्पस या कालावधीत उत्साह, जल्लोष आणि स्पर्धात्मक वातावरणाने भारावून गेला होता. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि उत्कृष्ट नियोजनामुळे हा महोत्सव अत्यंत यशस्वी ठरला. ५० हून अधिक स्वयंसेवक विद्यार्थी तसेच अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.
या यशस्वी आयोजनामुळे IIEBM इंडस बिझनेस स्कूलने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा आणि नेतृत्व कौशल्यांना प्रोत्साहन देण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली. संस्थेने सर्व सहभागी महाविद्यालये, विद्यार्थी, आयोजक, प्रायोजक आणि स्वयंसेवक यांचे मनःपूर्वक आभार मानले.






















Join Our Whatsapp Group