पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्या मा. प्रा. डॉ. जयश्री मगदूम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. जयश्री मगदूम यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलू उलगडून सांगितले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यात लक्ष्मीबाई पाटील यांनी दिलेल्या खंबीर साथीस विशेष अधोरेखित करत, त्यांच्या योगदानाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागमय जीवनाचा उल्लेख करत, त्यांनी संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या हितासाठी समर्पित केल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. संगीता अहिवळे, कला शाखेच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. कामयानी सुर्वे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, बी.व्होक मास कम्युनिकेशनचे नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय हिंगणे, तसेच प्रा. स्वप्ना हजारे, डॉ. शुभदा लोंढे, डॉ. निळकंठ डहाळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.





















Join Our Whatsapp Group