पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरिबांच्या उपचारासाठी ‘वरदान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रूग्णालयात रूग्णांची ‘हेळसांड’ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वॉर्डबॉय उपलब्ध नसल्याने तब्बल अर्धा तास रूग्णालयाच्या दारात रूग्ण उपचाराविना पडून राहिला होता. दरम्यान शिवसेना नेते जितेंद्र ननावरे यांचे बंधू चेतन ननावरे यांनी रूग्णालयातील स्टाफला विनंती केल्यानंतर त्या रूग्णाला तातडीच्या सेवेकरिता हलविण्यात आले.
चिखली येथील एक वृध्द आषाढी वारीत पायी जाताना पडले होते. त्यांच्या पायाला मोठी इजा झाली होती. त्यांच्या पायावर वायसीएम रूग्णालयात शत्रक्रिया देखील करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पायाची जखम पुन्हा वाढल्याने त्यांच्या मुलीने त्यांना उपचारासाठी आज दुपारी वायसीएम रूग्णालयात रिक्षातून आणले होते. मात्र रिक्षातून त्यांना आत रूग्णालयात नेण्यासाठी एकही वॉर्डबॉय येत नव्हता. तब्बल अर्धा तास ते वृध्द भर उन्हात रिक्षातच पडून होते. एवढा मोठा दवाखाना असून रूग्णालयाच्या दारातच रूग्णाची हेळसांड सुरू होती.
दरम्यान शिवसेना नेते जितेंद्र ननावरे यांचे बंधू चेतन ननावरे तेथे आले, त्यांनी सर्व परिस्थीती पाहिली. त्यानंतर चेतन ननावरे यांनी तात्काळ रूग्णालयात जाऊन डॉक्टरांना घडत असलेला प्रकार सांगितला आणि त्या रूग्णाला रिक्षातून उचलण्याची विनंती केली. त्यानंतर एका वॉर्डबॉयच्या मदतीने जितेंद्र ननावरे यांनी त्या वृध्दाला तातडीच्या सेवेसाठी दाखल केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने वायसीएम रूग्णालयावर करोडो रूपयांचा खर्च केला जातो. मात्र या रूग्णालयातील कारभारावर कोणाचाच वचक नसल्याचे अनेकदा समोर येत आहे. येथील सुरक्षेचा प्रश्न असो किंवा रूग्णांची होत असलेली हेळसांड, वारंवार वायसीएम रूग्णालयातील अनेक प्रकरणे समोर येत आहेत. आता तरी सत्ताधारी आणि प्रशासनाने याप्रश्नांकडे गांभिर्याने पाहण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.