पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील क्रोमा स्टोअरजवळील मोकळ्या जागेत शगुन चौकातील फुलव्यापारी व विक्रेत्यांचे स्थलांतर होणार आहे. याकरिता एकूण ३० गाळे बांधले जाणार आहेत. महापौर राहुल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भूमी व जिंदगी विभागाच्या बैठकीत या स्थलांतरावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी कापड, फुल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या विक्रीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते असते. खेड व मावळ तालुक्याबरोबरच शहरातील मोशी, चऱ्होली, डुडुळगाव याठिकाणीचे फुल उत्पादक शेतकरी याच बाजारात विक्रीसाठी फुले आणतात. मात्र याठिकाणी फुलबाजारासाठी स्वतंत्र जागा नसल्याने, शगुन चौकातील दुकानांसमोरील मोकळ्या जागेत सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत फुल बाजारात भरतो. याकरिता फुल व्यापाऱ्यांना या दुकान चालकांना अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागत आहे. त्यामुळे फुल बाजारासाठी स्वतंत्र जागा अथवा गाळे उपलब्ध करुन देण्याची या व्यापाऱ्यांची आग्रही मागणी होती. त्याकरिता पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ सदस्यांनी तत्कालीन महापौर नितीन काळजे यांची भेट घेतली होती.
दरम्यानच्या काळात महापालिकेच्या भाजी बाजारातील मोकळ्या गाळ्यांचा पर्याय देखील पुढे आला होता. मात्र, ही बाब संयुक्तीक न वाटल्याने नव्या जागेचा शोध सुरु होता. पिंपरीतील क्रोमा स्टोअर्सजवळील मोकळा भूखंड मेट्रोच्या पार्कींगसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. मात्र त्यातून शिल्लक राहणाऱ्या जागेवर स्थापत्य विभागामार्फत गाळे उभारले जाणार आहेत.
फुल बाजारासाठी स्वतंत्र जागा नसल्याने अनेक वर्षे व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या सदस्यांनी देखील या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाचे फुल व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे.
– राजू शिंदे, बाजार प्रमुख, पिंपरी उपबाजार.
शगुन चौकातील दुकानदारांच्या मर्जीवर फुल बाजाराची वेळ ठरत आहे. त्यामुळे सणा-सुदीच्या काळात फुल व्यापाऱ्यांना माल कमी किंमतीमध्ये विकण्याची वेळ येत आहे. स्वतंत्र जागेमुळे दिवसभर फुलबाजार सुरु राहिल. त्याचा ग्राहक व व्यापाऱ्यांना फायदा होईल.
– गणेश अहीर, फुल व्यापारी, पिंपरी.






















Join Our Whatsapp Group