पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील किवळे परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या लॉजवर पोलीसांनी रात्री छापा टाकला. यात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या चौघांना पोलीसांनी अटक केली असून १२ तरूणींची सुटका केली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे परिसरात साई लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक सुधीकर काटे, युनिट १ चे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक दिपाली मरळे, गुन्हे शाखेतील स्टाफ तसेच प्रोजेक्ट कालकी एन.जी.ओ. कडील स्टाफने साई लॉजमध्ये डमी गिऱ्हाईक पाठवून सापळा रचून छापा टाकला. यावेळी ३ मुलींची सुटका केली. तसेच हॉटेल मँनेजर हरिष सिन्ही शेट्टी (वय ४६, रा.साई लॉज किवळे) आणि कामगार अभिषेक मोहन शेट्टी (वय ३२, रा. साई लॉज, किवळे) यांना पकडून त्यांच्याकडे चौकशी केली असता देह विक्री करणाऱ्या मुलींच्या राहण्याच्या ठिकाणाबाबत माहिती काढून बोऱ्हाडेवस्ती, भोंडवेवस्ती, रावेत या भागात छापा टाकून ९ मुलींची सुटका केली. त्यानंतर या तरूणींना वेश्या व्यवसायासाठी वाहनातून ने-आण करणाऱ्या रत्नाबहाद्दुर रनबहाद्दुर प्रधान, (वय ३४, भोंडवे वस्ती रावेत), बालाजी रामराव माने (वय २५, सोमाटणे फाटा) या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान साई लॉजचा मालक शेखर दिपक सांडभोर (रा.किवळे), साई लॉजचे चालक प्रविण शेट्टी (रा. साई लॉज, किवळे) तसेच घर मालक सागर पांडुरंग भोंडवे (रा. भोंडवेवस्ती), भाडेकरू विनोद सदानंद शर्मा (रा.भोंडवे वस्ती, रावेत) यांच्या विरूध्द देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप ते आरोपी फरार आहेत. या प्रकरणात आरोपींनी वापरलेली मायक्रा कार, अँक्सेस मोपेड, हिरो होंडा मोटार सायकल अशी २ लाख ५० हजार रूपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली आहे.