पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आर्थिक भुर्दंड टाकणारे, अधिकाऱ्यांच्या अधिकारांवर गदा आणणारे तसेच ठेकेदारांसाठी त्रासदायक ठरत असलेल्या CIEL या त्रयस्थ संस्थेचे कंत्राट तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापौर रवी लांडगे यांच्याकडे केली आहे. प्रशासक कालावधीत तत्कालीन आयुक्तांनी कामाचा दर्जा राखण्याच्या नावाखाली महसुली व भांडवली कामांच्या देयकांची तपासणी करण्यासाठी CIEL या खासगी संस्थेची नियुक्ती केली होती. मात्र या नियुक्तीबाबत अनेक गंभीर आक्षेप उपस्थित होत आहेत.

नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यावतीने मावळ लोकसभा युवासेना प्रमुख राजेंद्र तरस यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शासकीय अधिकारी व अभियंत्यांच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी कोणताही स्पष्ट शासकीय नियम नसताना खासगी त्रयस्थ संस्था नेमण्यात आली. तसेच या संस्थेकडून नियुक्त करण्यात आलेल्या अभियंत्यांच्या पात्रता व तांत्रिक क्षमतेबाबत कोणत्याही स्पष्ट अटी नाहीत. राज्य शासनाच्या नियमानुसार अशा प्रकारच्या ऑडिटसाठी CEOP, IITसारख्या शासकीय किंवा समकक्ष संस्थांना अधिकार असताना CIELमध्ये तसा दर्जेदार तांत्रिक कर्मचारी आढळत नाही.

महापालिका सध्या महसुली व ४० टक्के भांडवली कामांच्या तपासणीसाठी या संस्थेला सुमारे १.७ टक्के मानधन देत असून, अंदाजे १५०० कोटींच्या कामांवर तब्बल २२.५० कोटी रुपये खर्च होत आहेत. आधीच अभियंत्यांच्या पगारावर खर्च होत असताना हा अतिरिक्त खर्च म्हणजे दरवर्षी सुमारे २५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान असल्याचा आरोप तरस यांनी केला आहे. याशिवाय, संस्थेकडे पुरेसा व सक्षम तांत्रिक कर्मचारी नसल्यामुळे बिलांची तपासणी करण्यास २५ ते ३० दिवसांचा विलंब होत असून, त्यामुळे ठेकेदारांना वेळेवर देयके मिळत नाहीत, अशी तक्रारही करण्यात आली आहे.
प्रशासक काळात नगरसदस्य नसल्याने कामांवर देखरेख ठेवण्यासाठी ही संस्था नेमण्यात आली असे गृहीत धरले, तरी आता प्रत्येक प्रभागात नगरसेवक कार्यरत असल्याने अशा संस्थेची आवश्यकता नसल्याचेही तरस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी सर्व प्रभागांच्या कार्यकारी अभियंत्यांची बैठक घेऊन त्यांचे मत जाणून घ्यावे, तसेच महापालिका महासभेत ठराव मंजूर करून CIEL संस्थेचे कंत्राट रद्द करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group