नगरसेविका निर्मला कुटे यांच्या संपर्क कार्यालयाचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी (Pclive7.com):- निर्मला कुटे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. नवीन असूनही गेल्या दिड वर्षात त्यांचे काम कौतुकास्पद आहे. प्रभागातील कामांचा त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असतो. पुढील २० वर्षाचे नियोजन करूनच या परिसरात कामे केली जात आहेत. त्यामुळे पिंपळे सौंदागरच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.
पिंपळे सौदागर प्रभागाच्या भाजपच्या नगरसेविका निर्मला कुटे यांच्या संपर्क कार्यालयाचे विजयादशमीच्या मुहूर्तावर आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, संदीप नखाते, गोपाळ माळेकर, नगरसेविका आरती चोंधे, सुनिता तापकीर, निता पाडाळे, सविता खुळे, पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, संजय कुटे, सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे, उन्नती फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय भिसे, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी कर्मचारी, पिंपळे सौदागर मधील सर्व सोसायटीचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लक्ष्मण जगताप म्हणाले की, पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेविका निर्मला कुटे यांचे प्रभागात चांगल्याप्रकारे काम सुरू आहे. येथील विकासकामांसाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जातो. केलेल्या कामाचे फळ त्यांना नक्कीच मिळणार आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांना नागरिकांशी संवाद साधण्यास मदत होणार आहे. पिंपळे सौदागर परिसरात झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे पाण्याची थोडी कमतरता भासत असली तरी, येत्या वर्षभरात येथील पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे. पुढील २० वर्षे डोळ्यासमोर ठेऊन या प्रभागात कामे केली जात आहेत. कुठल्याही विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. संरक्षण खात्यातील बंद असलेला रस्ता सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच तो देखील प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास आमदार जगताप यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.
यावेळी परिसरातील सोसायट्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निर्मला कुटे यांच्या कामाचे आपल्या भाषणांतून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत शेखर कुटे यांनी केले.






















Join Our Whatsapp Group