शास्ती कराबाबत भाजपकडून पुन्हा गाजर
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांना शास्तीकर माफीचा प्रत्यक्ष लाभ दिवाळीनंतर मिळणार असल्याचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना जाहीर केले. आत्तापर्यंत भाजपाने नागरिकांना आश्वासनांची नुसती गाजरे दाखवली आहेत. प्रत्यक्षात नागरीकांच्या हाती काहीच पडले नाही. एकनाथ पवारांचे शास्तीकराचे आश्वासन म्हणजे ‘लबाड लांडगं ढोंग करतयं, शास्तीकर माफचं सोंग करतयं’ अशी टिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
दत्ता साने यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलयं की, पिंपरी चिंचवड शहरातील ६०० चौरस फूट आकाराच्या निवासी बांधकामधारकांना शास्तीकर माफी आणि ६०१ ते १ हजार चौरस फूट आकाराच्या बांधकामांना ५० टक्के शास्तीकर अशी सवलत पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाणार आहे. दिवाळी नंतर संगणक प्रणालीमध्ये बदल केल्यानंतर १५ दिवसात हे काम पूर्ण नागरीकांना दिवाळीनंतर प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे भाजपचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी जाहीर केले आहे.
वस्तुत: शहरातील नागरीकांची जाचक असलेल्या शास्ती करापासून सुटका होण्यासाठी संपूर्ण शास्तीकर माफ होणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वीपासून आग्रही होता. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीने महापालिकेत ठराव देखील केला आहे. परंतु सत्ताबदलामुळे या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. प्रत्यक्षात शासन निर्णयामध्ये प्रत्येक महापालिकेने शास्तीकराबाबत स्वत: निर्णय घ्यावा असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र भाजपच्या नाकर्तेपणामुळे पदाधिका-यांमुळे शास्तीकराचा राक्षस नागरीकांच्या मानगुटीवर अजूनही बसलेला आहे. तसेच शास्तीकर सवलतीचा लाभ ५० हजार कुटूंबाना मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु प्रत्यक्ष ६०० चौरस फूट व ६०१ ते १ हजार चौरस फूट आकाराची निवासी बांधकामाची संख्या २५ हजारापेक्षा जास्त नाही. म्हणजेच या शास्तीकराचा फायदा शहरातील २ टक्के नागरीकांनाही फायदा झालेला नाही. भाजपाचे सरकार आश्वासनांची नुसती गाजरे दाखवित आहेत. प्रत्यक्षात नागरीकांच्या हाती काहीच पडत नाही. भाजप सरकारच्या पारदर्शी कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. शहरातील नागरीकांनाही आता कळून चुकले आहे की, भाजपाचा नुसता बोलाचाच भात बोलाचीच कढी असल्याचा आरोप दत्ता साने यांनी केला आहे.






















Join Our Whatsapp Group