पिंपरी (Pclive7.com):- प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान आजवर दुरवस्थेत आणि दुर्लक्षीत राहिले. त्याला आम्हीच जबाबदार असल्याची कबुली देत भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी सभेच्या निमित्ताने मैदानाची दुरूस्ती केली असून यापुढे मैदान वापरात येईल, अशी माहिती दिली. तर, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील बारा तालुक्यातून पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजेरी लावणार आहेत. सभेची संपूर्ण तयारी धिंग्रा मैदानावर केली असून ही सभा ऐतिहासिक सभा ठरणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि.३) फोडण्यात येणार आहे. त्यासाठी निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर सभेचे आयोजन केले आहे. सभेची तयारी करण्याचे नियोजन पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांनी मैदानाची आज प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सभेची सविस्तर माहिती दिली.
बापट म्हणाले की, पाच एकरची जागा असलेल्या मदनलाल धिंग्रा मैदानावरील मुख्यमंत्र्यांच्या सभेचे नियोजन पूर्ण झाले आहे. बसण्याची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील बारा तालुक्यातून पक्षाचे कार्यकर्ते सभेला येणार आहेत. ६५ हजारहून अधिक लोकांची हजेरी लागणार आहे. वाहन तळाची व्यवस्था केली आहे. मैदानावर स्क्रीन लावण्यात येणार आहेत. मैदानाबाहेर स्क्रिन्स लावल्या जाणार आहेत. बाहेरील बाजुवर बसून कार्यकर्त्यांना सभा पाहता येईल, अशी व्यवस्था आहे. ही सभा ऐतिहासिक सभा ठरणार आहे. या सभेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे बळ मिळणार आहे, असेही पालकमंत्री बापट म्हणाले.
यावेळी आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नेते आझम पानसरे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी, सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश कार्यकारीणी सदस्य उमा खापरे, नगरसेवक नामदेव ढाके, शितल शिंदे, कार्यकर्ते अमित गोरखे, अनुप मोरे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड आदी उपस्थित होते.