पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्तालय सुरू होऊन आज तीन महिने होत आले तरीही शासनाने आयुक्तालयास अद्याप मनुष्यबळ व गाड्या उपलब्ध करून दिल्या नाहीत. पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या शाखा सुरू झाल्या; मात्र अधिकार्यांना बसण्यास जागादेखील उपलब्ध नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड हे श्रीमंत महापालिकेतील गरीब आयुक्तालय असल्याची खंत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केली. मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या वेळी ते बोलत होते.
पोलीस आयुक्तांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेची एकंदरीत परिस्थिती जाणून घेण्यासाठी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. पत्रकारांनी आयुक्तांना आयुक्तालयाच्या नव्याने वाहने तसेच देण्यात आलेले मनुष्यबळाबाबत माहित विचारली असता. आयुक्तांनी मनुष्यबळ व गाड्या यांची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचे सांगितले. पिंपरी चिंचवड आयुक्तालयासाठी आणखी मनुष्यबळ उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना पुणे आयुक्तालयातून आलेले मनुष्यबळ अतिरिक्त असल्याचे सांगून ते परत मागवले असून आम्ही त्यासाठीसुद्धा झगडत असल्याचे आयुक्तांनी जाहीरपणे सांगितले. एकंदरीत पिंपरी चिंचवडचे स्वतंत्र आयुक्तालय झाले असले तरी पोलिसांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास राजकीय अनास्था असल्याचे दिसून येत आहे.
घोषणा हवेत विरल्या
चिखली पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी अपर आयुक्त मकरंद रानडे यांनी आयुक्तालयाची परिस्थिती व मागणी असा पूर्ण लेखा-जोखा मांडला होता व यावेळी लवकरात लवकर आम्हाला योग्य ते सहकार्य करावे, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. यावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी लवकरच मनुष्यबळ आणि वाहने उपलब्ध करून देऊ असे जाहीर केले होते; मात्र त्यानंतर काहीच मिळाले नसल्याने त्या घोषणा हवेतच विरल्याची चर्चा आहे.
कर्मचार्यांची दिवाळी गोड
दिवाळी आली तरी अद्याप आयुक्तालयात जे लोक नियुक्त झाले आहेत, त्यांचे पगार झाले नसल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू असून पुणे आयुक्तालयाकडून वर्ग झालेल्या कर्मचार्यांच्या पगार करण्याचे काम दिवाळीपूर्वी होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे वर्ग झालेल्या कर्मचार्यांची दिवाळी गोड होणार आहे.
तक्रार पेटीला प्रतिसाद
तक्रार पेटीमुळे पोलिसांना गोपनीय माहिती मिळू लागल्याचे आयुक्तांनी सांगितले. ते म्हणाले, तक्रारपेटीला नागरिक विशेषतः विद्यार्थीनी उत्तम प्रतिसाद देत आहेत. हेच या उपक्रमाचे यश आहे. तक्रारी येतील तशा दाखल करून घेणे त्यावर कारवाई करणे, हा आमचा अजेंडा आहे तो आम्ही राबवत आहोत.






















Join Our Whatsapp Group