पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत झोपडपट्टीधारकांकडून आकारण्यात येणाऱ्या सेवा कराच्या वसुलीस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या कालावधीत झोपडपट्टीधारकांनी सेवा करापोटी एकूण १३ लाख ८१ हजार ८६९ रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये ऑफलाईन पद्धतीने ७ लाख ४६ हजार ४३५ रुपये तर ऑनलाइन पद्धतीने ६ लाख ३५ हजार ४३४ रुपयांचा कर जमा झाला आहे. झोपडपट्टीवासीय कर भरण्यामध्ये मागे नसून शहराच्या विकास प्रक्रियेत तेही सक्रिय सहभाग नोंदवत असल्याचे यावर्षीच्या कर संकलनातून स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही वर्षांतील सेवा कर भरण्याची आकडेवारी पाहता झोपडपट्टीधारकांचा कर भरण्याबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन सातत्याने दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एप्रिल व मे महिन्याच्या कालावधीत ४ लाख ३३ हजार १६६ रुपये, २०२३-२४ मध्ये ९ लाख ६ हजार ९९१ रुपये, २०२४-२५ मध्ये २ लाख २७ हजार ८६७ रुपयांचा सेवा कर जमा झाला होता. यावरून झोपडपट्टीधारक नागरिकांकडून सेवा कर भरण्यास सातत्याने प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे, डिजिटल व्यवहारांना नागरिकांकडून वाढती पसंती मिळत असून सेवा कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. चालू वर्षातील एकूण कर संकलनामध्ये ऑनलाइन भरण्याचे प्रमाण सुमारे ५० टक्के आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत ऑनलाइन कर भरण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून नागरिक अधिकाधिक डिजिटल माध्यमांचा स्वीकार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचत असून कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि सोयीस्कर झाली आहे.

झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत नागरिकांना सेवा कर भरण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच झोपडपट्टी सेवा कराची बिले झोपडपट्टी परिसरातील महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच वितरित करण्यात येत आहेत. महिला बचत गटांकडून सेवा कर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात असून कर भरण्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे. या उपक्रमांमुळे झोपडपट्टीधारक नागरिकांचा सेवा कर भरण्यातील सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टीधारक नागरिक सेवा कर भरण्यामध्ये मागे नसून शहराच्या विकास प्रक्रियेत जबाबदारीने सहभाग घेत आहेत, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या सेवाकर वसुलीस नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद हा त्यांच्या नागरी कर्तव्यांविषयीच्या जागरूकतेचे प्रतीक आहे. विशेषतः ऑनलाइन कर भरण्याकडे वाढत असलेला कल हा डिजिटल प्रशासनाला मिळणारा नागरिकांचा विश्वास दर्शवितो.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
झोपडपट्टीधारक नागरिकांकडून सेवा कर भरण्यास मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा नागरिकांच्या वाढत्या नागरी जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. शहराच्या विकासासाठी महसूल संकलन अत्यंत महत्त्वाचे असून झोपडपट्टीवासीयही त्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन हेच दर्शवित आहेत. झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत नागरिकांना कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. सेवा करातून प्राप्त होणारा महसूल विविध नागरी सुविधा आणि विकासकामांसाठी महत्त्वाचा असून सर्व झोपडपट्टीधारक नागरिकांनी नियमितपणे कर भरून शहर विकासातील आपला सहभाग अधिक दृढ करावा.
– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
झोपडपट्टीधारक नागरिकांकडून सेवा कर भरण्यास मिळत असलेला प्रतिसाद हा अत्यंत समाधानकारक असून नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत जागरूकता वाढत असल्याचे यातून दिसून येते. विशेषतः ऑनलाइन कर भरण्याला मिळणारी वाढती पसंती ही डिजिटल सेवांबाबत नागरिकांचा वाढता विश्वास दर्शविते. झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत झोपडपट्टीतील महिला बचत गटांच्या (सोनचिरैया सारथी शहर उपजिविका केंद्र) सहकार्याने सेवा कराची बिले वितरित करण्यात येत आहेत. तसेच विभागामार्फत जनजागृती करणे, ऑनलाइन व ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांतून सेवाकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे यामुळे झोपडपट्टीवासीयांचा सेवाकर भरण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे.
– अण्णा बोदडे, उप आयुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग




















Join Our Whatsapp Group