पिंपरी (Pclive7.com):- विषारी दारुकांडामुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आता खुलेआम सुरू असलेल्या गांजा विक्रीचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे याबाबत पोलिसांना माहिती देऊनही तात्काळ कारवाई करण्यात टाळाटाळ झाल्याचा आरोप होत असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

भाजपच्या नगरसेविका अर्चना करांडे यांचे पती अक्षय कारंडे यांनी या प्रकाराचा पर्दाफाश केला. निगडी प्रभागात फेरफटका मारत असताना त्यांच्या निदर्शनास एक महिला खुलेआम गांजा विक्री करत असल्याचे आल्याचे सांगितले जाते. यावेळी गांजा खरेदी करणाऱ्या व्यक्तीलाही त्यांनी पकडले. अक्षय करांडे यांनी संबंधित महिला आणि खरेदीदाराला रोखून धरत निगडी पोलिसांना तातडीने घटनास्थळी येण्याची सूचना दिली. मात्र बराच वेळ उलटूनही पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच पोलिसांकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

फुगेवाडी-दापोडी येथील विषारी दारुकांडानंतर शहर पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्या घटनेतून धडा घेऊन अवैध धंद्यांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना गांजा विक्रीसारख्या प्रकारांबाबत पोलिसांची उदासीनता कायम असल्याचे या घटनेतून समोर आल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
या प्रकरणामुळे शहरातील अवैध अमली पदार्थांच्या विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिस प्रशासनाने याबाबत कठोर आणि प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.




















Join Our Whatsapp Group