पिंपरी (Pclive7.com):- ‘रावण’ टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड अनिकेत जाधव याच्या स्मृतिदिनानिमित्त या टोळीचा परिसरात दहशत करण्याचा ‘प्लॅन’ होता. रावणसेना निगडी परिसरात दहशत निर्माण करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या टोळीची मस्ती जिरवण्यासाठी जय्यत तयारी केली. मात्र, याचा कानोसा रावणसेनेला लागताच या टोळीने तेथून पळ काढला. पोलिसांचा हा आगळावेगळा मूड पाहून रावणसेन गळपाटल्याचे चित्र पहायला मिळाले.
रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याचा २० नोव्हेंबर २०१७ ला वर्चस्ववादातून खून झाला होता. त्याच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाच्या नावाखाली परिसरात पुन्हा गँगची दहशत निर्माण करण्याचा रावण टोळीचा डाव होता. पोलिसांनी देखील गुन्हेगारांची धरपकड करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली. चौकाचौकात साध्या वेशात पोलिस तैनात करण्यात आले होते. ज्या ठिकाणी अनिकेचा खून झाला त्या ठिकाणी पोलिसांची गस्त सुरु होती. रावणसेना हद्दीत घुसल्यानंतर बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद करून रावणसेनेवर झडप घालण्यात येणार होती. मात्र पोलिसांनी केलेल्या या जय्यत तयारीची कुणकुण रावणसेनेला लागल्याने टोळीने या हद्दीतून पळ काढला.
मागील महिन्यात पोलिसांना वेळेत माहिती न मिळाल्याने रावणसेनेच्या गुंडानी मयत अनिकेत जाधवच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापला. ज्या ठिकाणी खून झाला त्या ठिकाणी जाऊन रावणसेनेने नंग्या तलवारीचा नाच केला. त्यामुळे पोलिसांनी या वेळी विशेष खबरदारी घेतली होती. पोलिसांनी वाढदिवस साजरा करणाऱ्यांची माहिती संकलित करून त्यांची धरपकड सुरु केली आहे. त्यामुळे रावणसेनेची पळापळ सुरु झाली आहे.























Join Our Whatsapp Group