पिंपरी (Pclive7.com):- आमदार लक्ष्मण जगताप आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात अखेर मनोमिलन झाले आहे. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी या दोन दिग्गजांमध्ये समेट घडवून आणला असून काल रात्री या दोन नेत्यांसमवेत गुप्त बैठकीत हे ‘मनोमिलन’ झाल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वाद जगजाहिर आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बारणेंकडून झालेल्या पराभवाचे शल्य जगतापांना आहे. या निवडणुकीत युती झाली असून बारणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. प्रचाराला सुरूवात देखील झाली आहे. मात्र नाराज जगताप हे युतीच्या प्रचारापासून अलिप्त राहिले होते. त्यांची मनधरणी करण्यासाठी सुरूवातीला स्वत: बारणे यांनी त्यांच्या घरी जाऊन प्रयत्न केले. त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी देखील जगतापांच्या घरी जाऊन समेट घडविण्याचा प्रयत्न केला. परंतू जगतापांचे मन वळले नसल्याने शहरात युतीचा प्रचार थंडावल्याचे चित्र होते. अखेर पुन्हा गिरीष महाजन यांनी काल रात्री मध्यस्थी करत जगताप आणि बारणे यांच्यात मनोमिलन घडवून आणले असल्याचे विश्वनिय वृत्त आहे.
त्यानुसार आज दि.८ रोजी लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांची एकत्रित तातडीची पत्रकार परिषद पिंपरीत होणार आहे. त्यामुळे बारणे यांची चिंता मिटली असून त्यांच्या पुढील प्रचारात आमदार जगताप आणि समर्थक ताकतीने उतरणार असल्याचे सुत्रांकडून समजते.