पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना ‘विक्रमी मताधिक्क्य’ देणार असल्याची ग्वाही भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यात ‘मनोमिलन’ झाले. त्यानंतर पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, अमर मुलचंदानी, उमा खापरे, गजानन चिंचवडे, महेश कुलकर्णी, अमोल थोरात, नामदेव ढाके, भाजपा-शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, श्रीरंग बारणे यांच्यासोबत मतभेद होते, मनभेद नव्हते. आणि जे मतभेद होते ते विकासाच्या कामाबद्दल होते. वैयक्तीक स्वरूपाचे कुठलेही मतभेद नव्हते. तसही पाहिलं तर माझ्या पक्षाचे ब्रिद वाक्य आहे, पहिला देश, मग पक्ष, आणि नंतर व्यक्ती.. माझ्या कुठल्याही नफा-तोट्या पेक्षा पक्ष मला मोठा आहे. पक्षा पेक्षा मला देश मोठा आहे. म्हणून देशला मोदींची गरज अाहे. या एका विचारानेच मी बारणेंसोबत एका व्यासपिठावर आलो आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये जे ६ विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्क्य कशी देता येतील त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष म्हणून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही लक्ष्मण जगताप यांनी दिली.