पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने १० वी आणि १२ वीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उद्या शुक्रवार दि.५ जुलै रोजी इंद्रायणीनगरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.
यावेळी खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विलास मडिगोरी यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणीनगर प्रभागात दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. या वर्षीही श्री साई चौक मित्र मंडळ व विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता प्रभागात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते १ या वेळेत भोसरी पांजरपोळ येथील अंध शाळेत अन्नदान व आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तसेच प्रभागातील महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, बिस्कीट वाटप करण्यात येणार आहे. भोसरी येथील आश्रम शाळेत ३५० मुलं राहतात, त्या मुलांना आर्थिक मदत व अन्नदान करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे चिंचवड येथील गुरुकुलाम संस्थेस आर्थिक मदत व अन्नदान करण्यात येणार आहे. सायंकाळी १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.