पिंपरी Pclive7.com):- ऑल इंडिया धनगर समाज महासंघ आणि सकल धनगर समाज पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने धनगर समाजातील १०वी आणि १२वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी प्राप्त करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा रविवारी (दि.१४ जुलै) आयोजित करण्यात आला आहे. खंडोबा चौक, आकुर्डी येथील खंडोबा मंदिर कार्यालयात रविवारी सायंकाळी साडे चार वाजता हा समारंभ पार पडणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुल जाधव हे असणार आहेत. तर अखिल महाराष्ट्र धनगर समाज संस्थेचे अध्यक्ष अंकुश भांड आणि पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी बहुजन विचारवंत बलभीम माथेरे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे तसेच तळोदा संस्थानचे जहागीरदार अमरजितराजे बारगळ हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक जयश्री देवडे तसेच ‘धुमस’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्माते टीममधील शिवाजी दोलतडे, कार्तिक दोलतडे, डी. गोवर्धन, रोहन पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड शहरातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक ऑल इंडिया धनगर समाज महासंघ आणि सकल धनगर समाज यांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.