पुणे (Pclive7.com):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे प्रादेशिक विभागातील पुणे जिल्हा कार्यालयामार्फत मंजूर कर्जाच्या धनादेशांचे वितरण व वृक्षारोपनाचा कार्यक्रम महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या शुभहस्ते पार पडला.
येरवडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील या कार्यक्रमात पुणे जिल्हा कार्यालयांतर्गत बीजभांडवल योजनेंतर्गत ०३ व अनुदान योजनेंतर्गत ०१ (एक) लाभार्थीस महामंडळामार्फत बँकांनी मंजूर केलेल्या रु.१०.५० लाख कर्जापैकी महामंडळाचे बीजभांडवल रु.१.७० लाख व अनुदान रु.४० हजार प्राथिनिधीक स्वरुपात महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांचे हस्ते वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार होते. कार्यक्रमास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दि. खं. खुडे, जिल्हा व्यवस्थापक, शि. लिं. मांजरे, समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे, हरेश्वर डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप अवघडे, सुनिल बेजगमवार, राजेश राजगे, सागर गायकवाड, दिपक चकाले यांच्यासह इतर कार्यकर्ते, लाभार्थी उपस्थित होते.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची बंद पडलेली वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. तसेच, पुढे कामकाज ऑनलाईन करणार असल्याची घोषणाही यावेळी अमित गोरखे यांनी केली. तसेच, शासनाकडून महामंडळास लवकरच आवश्यक तेवढा निधी पुरविण्यात येत आहेत. अन्य बंद असलेल्या महामंडळाच्या योजनाही लवकरच सुरु करीत आहोत, असेही ते म्हणाले.