पिंपरी (Pclive7.com):- कस्पटेवस्ती, काळेवाडी फाटा जवळील प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडातील अतिक्रमणे अखेर हटविण्यात आली आहेत. स्थानिक नगरसेवक संदिप कस्पटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे याठिकाणी अर्धवट असलेल्या सिमाभिंतीचे काम देखील आज पूर्ण करण्यात आले आहे.
कस्पटेवस्ती येथे काळेवाडी फाट्याजवळ प्राधिकरण आरक्षित रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भुखंडाच्या सिमाभिंतीचे अर्धवट राहिलेले काम पुर्ण करावे आणि रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे, पार्किंग, वाळूच्या गाड्या, ट्रॅव्हल्सच्या गाड्या आदी अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरसेवक संदिप कस्पटे यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. यासंबंधी आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील संबंधित विभागाला सुचना दिल्या. गेल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी देखील अधिकाऱ्यांसह याठिकाणाची पाहणी केली होती. त्यानंतर अखेर आज या ठिकाणी अर्धवट सिमाभिंत पुर्ण करण्यात आली. तसेच येथील अतिक्रमणे ही हटविण्यात आली.
काळेवाडी फाट्याहून कस्पटेवस्ती येथे प्रवेश करताना सुरवातीलाच येथील अतिक्रमणांमुळे परीसराला बकालपणा आला होता. लहान मुले-मुली, महिला भगिनी व नागरिकांना येथून जाताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. येथील मोकळ्या जागेत कचरा, दुर्गंधी, रस्त्यापर्यंत आलेली अनधिकृत वाहने, टपऱ्यांचे अतिक्रमण होते. तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी दारु पिणाऱ्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. आता तो त्रास कायमस्वरुपी संपला आहे. येथुन ये-जा करणाऱ्या परीसरातील नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास टाकला अाहे.
कस्पटेवस्ती परिसरातील नागरिकांना स्वच्छ परिसर आणि चांगल्या सुविधा देण्यासाठी मी कटिबध्द आहे. ह्या मोकळ्या जागेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून येथे खेळाचे मैदान, विरंगुळा केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहेत. संबंधित विभागाशी यासंबंधी पाठपुरावा सुरू असून लवकरच येथे खेळाचे मैदान आणि विरंगुळा केंद्र उभे राहिल.
– संदीप कस्पटे, नगरसेवक