पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्या प्रचाराच्या खर्चाच्या पहिल्या तपासणीमध्ये तफावत आढळली. बारणे यांच्या खर्चात ३५ लाखांची, वाघेरेंच्या खर्चात सात लाखांची तफावत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी तिघांनाही नोटीस बजावली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार खर्चाची पहिली तपासणी पार पडली. त्यानुसार उमेदवारांकडे असलेल्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवहीत आणि निवडणूक विभागाकडे असलेल्या शॅडो नोंदवहीत तफावत आढळून आली आहे. महायुतीचे उमेदवार बारणे यांनी १३ लाख ४० हजार ३६४ रुपयांचा खर्च दाखविला आहे, तर निवडणूक विभागाच्या नोंदवहीत ४८ लाख ९७ हजार ६७२ रुपये खर्च झाल्याची नोंद केली आहे. बारणे यांच्या हिशेबात ३५ लाख ५७ हजार ३०८ रुपयांची तफावत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे यांनी १८ लाख ६७ हजार ११९ रुपयांचा खर्च दाखविला आहे. तर, निवडणूक विभागाच्या नोंदवहीत २५ लाख ८४ हजार ३१७ रुपये खर्च झाल्याची नोंद केली आहे. वाघेरे यांच्या हिशेबात सात लाख १७ हजार १९८ रुपयांची तफावत असल्याचे स्पष्ट झाले. ‘वंचित’च्या उमेदवार माधवी जोशी यांनी ७२ हजार १२५ रुपयांचा खर्च दाखविला आहे. तर, निवडणूक विभागाच्या नोंदवहीत ९३ हजार ३०५ रुपये खर्च झाल्याची नोंद केली आहे. जोशी यांच्या हिशेबात २१ हजार १८० रुपयांची तफावत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बारणे, वाघेरे, जोशी यांना नोटीस बजाविली असून, ४८ तासांच्या आत म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे. मुदतीमध्ये म्हणणे न दिल्यास खर्च मान्य असल्याचे गृहीत धरून त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाणार आहे.