पिंपरी (Pclive7.com):- विकास कामांच्या बाबतीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला अभियंत्यांना कार्यालयात बोलाऊन त्यांच्याशी असभ्य भाषेत शिवीगाळ केल्याने आकुर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. एका ज्येष्ठ नगरसेवकाने कनिष्ठ कर्मचारी महिलेशी अर्वाच्य भाषेत अरेरावी करणे अत्यंत लांच्छनास्पद आहे. पालिकेत सत्ता नसताना एका कर्मचारी महिलेचा राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून असा मानसिक छळ होत असेल तर प्रत्यक्ष सत्ता हाती आल्यानंतर काय होईल ?, असा प्रश्न पीडित महिलेने उपस्थित केला आहे.
यासंदर्भात इंजिनिअर्स असोसिएशनने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महिला कनिष्ठ अभियंता पल्लवी सासे व अनिल काशिद यांना प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक जावेद शेख यांनी सोमवारी (दि.१६) सकाळी त्यांच्या खासगी कार्यालयात बोलावून घेतले. प्रभागामध्ये चालू असलेल्या स्थापत्य विषयक विकासकामांबाबत विचारणा केली. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अरेरावीच्या भाषेत कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर असभ्य भाषेत शिवीगाळ केली, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे शेख पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त प्रकरणावरून जावेद शेख यापूर्वी अनेकदा चर्चेत सापडलेले नगरसेवक आहेत. मागील वर्षी देखील पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सुशील लवटे यांच्या चेहऱ्यास शेख यांनी काळे फासून त्याची ‘व्हिडीओ क्लिप’ सोशल मिडीयावर व्हायरल केली होती. हे उदाहरण असताना शेख यांच्याकडून पुन्हा ही घटना घडली आहे. यावरून ज्येष्ठ लोकप्रतिनिधी असलेले शेख यांचा स्वतःवरील ताबा सुटत चालल्याचे दिसते. अभियंता महिलेला आपल्या कार्यालयात बोलावून त्यांना शिवीगाळ करणे हे त्यांना आणि महिलांना नोकरीत, राजकारणात आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शोभा देणारे नाही, हे शेख यांनी लक्षात ठेवावे, अशी टिका त्यांच्यावर महिला प्रतिनिधी करत आहेत.