पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी कामकाजासाठी महापालिका कार्यालयात न येता ऑनलाईन पध्दतीचा वापर करून कामकाज करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने केले होते. या आवाहनास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोना सारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होत असून नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.
पालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनाने विविध स्तरावर उपाययोजना केल्या आहेत. महापालिका कार्यालयांमध्ये दैनंदिन आणि वैयक्तिक कामासाठी नागरिक तसेच अन्य सेवाभावी संस्थांचे समाजसेवक, ठेकेदार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांची वर्दळ असते. गर्दीची ठिकाणे टाळणे, हस्तांदोलन टाळणे आदी प्राथमिक सुचना महापालिकेने विविध माध्यमातून नागरिकांपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय खबरदारी म्हणून उद्याने, वाचनालये, शाळा, स्पर्धा परीक्षा केंद्र, जलतरण तलाव, नाट्यगृहे आदी आस्थापना देखील महापालिकेने बंद केल्या आहेत. महापालिकेशी संबंधित काही कामकाज असेल तर शक्यतो ऑनलाईन पध्दतीचा वापर करण्याचे आवाहन देखील पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. काही अपवादात्मक परिस्थितीत अथवा कामकाजाच्या आवश्यकतेनुसार नागरिकांना महापालिका कार्यालयात येणे आवश्यक असल्यास त्यासाठी काही प्रतिबंधात्मक स्वरुपाच्या अटी घालण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सक्रिय प्रतिसादाबद्दल महापालिका प्रशासनाने समाधान व्यक्त केले असून यापुढेही असेच सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.