पिंपरी (Pclive7.com):- राज्यासह संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आले आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महापालिका तसेच राज्य सरकारकडून योग्य त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांनी त्यांचे एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव तापकीर यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.
महापालिका कर्मचारी महासंघाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेत सुमारे साडेसात हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांची संख्या देखील मोठी आहे. या आपत्तीत कर्मचा-यांनी माणुसकी दाखवत एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे. त्याची रक्कम अंदाचे दीड कोटीच्या आसपास जात आहे.
महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे म्हणाले, जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर उपाय आणि उपचार करण्यासाठी प्रचंड आर्थिक भार पडत आहे. राज्य सरकार, महापालिका स्तरावर त्याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. या सर्वांना मदत म्हणून सामाजिक बांधिलीकी जपत महापालिकेतील कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचारी देखील एक दिवसाच्या पेन्शची रक्कम देणार आहेत. दीड कोटीच्या आसपास रक्कम होत आहे.






















Join Our Whatsapp Group