पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. आज एका दिवसांत तर ७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेले रूग्ण हे रूपीनगर, संभाजीनगर तसेच चऱ्होली परिसरातील आहेत. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून चऱ्होली, रूपीनगरचा परिसर आज दि.१८ रोजी मध्यरात्री ११ वाजल्यापासून पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आज दि.१८ दिलेल्या अहवालानुसार तब्बल ७ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यात चार पुरूष आणि तीन महिलेचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील सध्या कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४५ वर पोहचली असून त्यातील ३८ रूग्णांवर वायसीएममध्ये तर ६ जणांवर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच एक जणावर पुणे जिल्ह्या बाहेरील रूग्णालयत उपचार सुरू आहेत. दरम्यान शहरात आजपर्यंतच्या एकूण बाधित रूग्णांची संख्या ६१ वर गेली आहे. तसेच १५ जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार १२६ संशयित रुग्णांच्या घशातील द्रव्यांचे नमुने शुक्रवारी तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्हीकडे) पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज आले आहेत. त्यात ४ पुरूष आणि ३ महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले हे रुग्ण आहेत. त्यामध्ये पुरूषांचे वय १२, ३५, ३८, २१ आणि महिलांचे वय १०, ३०, ६२ आहे. आज आढळलेले रूग्ण रूपीनगर, संभाजीनगर तसेच चऱ्होली परिसरातील आहेत. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून चऱ्होली, रूपीनगरचा परिसर आज दि.१८ रोजी मध्यरात्री ११ वाजल्यापासून पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा परिसर बंद ठेवण्यात येणार आहे. येथील नागरिकांना या परिसरातून बाहेर जाण्यास व बाहेरील नागरिकांना या भागात येण्यास पूर्णपणे बंदी करण्यात येणार आहे. सील केलेल्या भागात प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group