पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. परंतु काही अडचणी सोडविल्या जाण्याची गरज आहे. सध्याच्या आणि भविष्यातील आरोग्य समस्यांना तोंड द्यायला सक्षम यंत्रणा तयार केली जाणे गरजेचे असून, प्रभागवार दोन रुग्णवाहिकांची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी आयुक्त आणि महापौर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
कोविड महामारीमुळे पिंपरी चिंचवड शहरवासिय आणि जनता हैराण झाली आहे. गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्याकरिता रुग्णवाहिका वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी असून अनेक ठिकाणी रुग्णांची लूट सुरू असल्याचा प्रकार चालू आहे. किरकोळ अंतरासाठी हजारोंनी रकमा घेतल्या जात असल्याच्या तक्रारी वर्तमानपत्रातून आणि प्रत्यक्ष नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे. मनपा प्रशासनाने याबाबत नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.
सध्या आलेल्या आरोग्य संकटातून धडा घेत यंत्रणांना अधिक सक्रिय करण्याच्या उद्देशाने, या बाबीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने गांभीर्यपूर्वक विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रभागवार किमान दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यास रुग्ण आणि नागरिकांना दिलासा मिळेल. त्यामुळे सूचनेचा विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर पिंपरी चिंचवड शहराचे स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, शिवराज लांडगे, उदय गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.