पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेली दोन दशके कार्यरत असलेल्या माधुरी गोडांबे यांनी नुकताच शिवसेना भवन-मुंबई येथे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची ‘सांस्कृतिक शहर’ अशी ओळख ठळक करण्यासाठी मनापासून झटणाऱ्या आघाडीच्या कार्यकर्त्यांपैकी माधुरी गोडांबे ह्या या एक धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत.
शहरातील सांस्कृतिक उपक्रमांना अधिक मोठं व्यासपीठ लाभावं, म्हणून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. मनसेच्या विविध आंदोलनांमध्ये आघाडीवर असणाऱ्या माधुरी गोडांबे यांनी अल्पावधीतच ‘लढाऊ नेत्या’ म्हणून आपला ठसा उमटविला होता.
‘मनसे’च्या स्थापनेपासून, शहरात मनसे वाढविण्यासाठी मनापासून झटणाऱ्या मोजक्या मनसैनिकांपैकी माधुरीताई या बिन्नीच्या शिलेदार होय. मात्र, शहरातील मनसेच्या कंपूशाहीच्या राजकारणामुळे त्यांना मनसेला रामराम ठोकला. आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आपली वाटचाल सुरूच ठेवली.
बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने शिवसेनेची बांधणी सुरू आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांना सेनेत आणण्यासाठी शहरप्रमुख सचिन भोसले यांच्या रणनितीचा हा दृश्य परिणाम आहे.