पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, चाकण, तळेगाव या भागांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात लोकवस्ती निर्माण झाल्याने लोकसंख्या व वाहतूक वाढली आहे. पोलिसांना पेट्रोलिंग करण्यासाठी सुलभ व्हावे म्हणून महापालिका ५० स्मार्ट दुचाकी वाहने खरेदी करून देणार आहे. त्यासाठी ४८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
शहरात तसेच परिसरातील औद्योगिक क्षेत्रामुळे गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. चोरींचे प्रमाणही वाढत आहे. छोट्या-मोठ्या गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी पोलिस पेट्रोलिंगची आवश्यकता आहे. त्यासाठी दुचाकी हे सुलभ व वेगवान वाहन आहे.
तातडीने कमी वेळेत अरूंद गल्ली, बोळ व झोपडपट्टी आदी ठिकाणी पोहचण्यास मदत होते. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी महापालिकेकडे पोलिसांच्या पेट्रोलिंगसाठी पल्सर १५० डीटीएस या मॉडेलच्या ५० दुचाकी वाहनांची मागणी पालिकेकडे १ ऑगस्टला केली आहे. वाहनांसोबत २ माईक, सायरन, प्लॅस लाईट, कॅमेरा, जीपीएस ट्रॅकींग सिस्टीम, जॅमर होल्डर, हेल्मेट आदी असणार आहेत.
दुचाकी दर ९४ हजार ८५० आहे. एकूण ५० दुचाकीसाठी एकूण ४७ लाख ४२ हजार ४०० रूपये खर्च अपेक्षित आहे. मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर केलेल्या दंडात्मक कारवाईतून २ कोटी ३४ लाख रूपये पोलिसांनी जमा केले आहेत. त्या निधीतून हा खर्च केला जाणार आहे.