पिंपरी (Pclive7.com):- विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एक नारळाचे झाड जळून खाक झाले. तसेच इमारतीच्या टेरेस वरील काही साहित्यही जळाले. ही घटना पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटी येथे घडली.
घटनेची माहिती मिळताच माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी तत्परता दाखवत महावितरण आणि अग्निशामक दलास कळवत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान रोझलँड सोसायटीमधील नागरिकांनी ३० अग्निरोधक सिलेंडरचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
या घटनेबाबत माहिती देताना नाना काटे म्हणाले की, पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी गेट नंबर ४ मधील क्लब हाऊस मागील बाजूस शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली होती. याची माहिती सोसायटी चेअरमन संतोष मसकर यांनी दिली. त्यानंतर त्वरित एमएसईबीला कळवून विद्युत पुरवठा बंद केला. आणि अग्निशामक विभागाच्या वतीने तत्परता दाखवत त्वरित आग विझवण्यात आली. त्यामुळे होणारी मोठी हाणी टळली.