पिंपरी (Pclive7.com):- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बॉलीवूडचा ‘टारझन’ अभिनेता हेमंत बिर्जे जखमी झाले आहेत. हेमंत बिर्जे यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगीही गाडीत होती. अपघातात त्यांनाही दुखापत झाली आहे. मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला आहे. कारने दुभाजकाला दिलेल्या धडकेनंतर हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
१९८५ मध्ये आलेल्या ‘टारझन’ चित्रपटामुळे हेमंत बिर्जे प्रसिद्धीस आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “बॉलिवूड अभिनेता हेमंत बिर्जे आपल्या पत्नी आणि मुलीसह प्रवास करत असताना हा अपघात झाला. तळेगाव टोलनाक्याजवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारने दुभाजकाला धडक दिली. अपघातात पत्नी आणि मुलीलाही दुखापत झाली आहे”.
हेमंत बिर्जे आणि त्यांच्या पत्नीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं असून मुलगी सुरक्षित आहे. मुलीला कोणतीही दुखापत झालेली नाही. हेमंत बिर्जे आणि त्यांच्या पत्नीला पवना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.
‘टारझन’ चित्रपटानंतर प्रसिद्धीस आलेले हेमंत बिर्जे सध्या मात्र बॉलिवूडपासून दूर आहेत. ते यश ते पुढे टिकवू शकले नाहीत आणि बॉलिवूडपासून दूर होत गेले. हेमंत बिर्जे सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचे. दिग्दर्शक बब्बर सुभाष आपल्या चित्रपटासाठी अभिनेत्याचा शोध घेत असताना त्यांची नजर हेमंत बिर्जे यांच्यावर पडली होती. त्यानंतर हेमंत बिर्जे यांना पहिला चित्रपट मिळाला. अभिनेत्री किमी काटकरसोबतच्या काही बोल्ड सीनमुळे चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती.