पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आज (दि.२३ जून) जाहीर करण्यात आली. सदर यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध होणार आहे. दरम्यान, प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे का हे खात्री करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पर्यंतची विधानसभा मतदारयादी ग्राह्य धरून त्याची प्रभागनिहाय विभागणी करून प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी आज गुरुवार, दिनांक २३ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (www.pcmcindia.gov.in) तसेच महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मतदारांसाठी पाहण्यास उपलब्ध केलेली आहे.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, विधानसभा मतदार संघातील भाग प्रभाग क्रमांक १ ते ४६ मध्ये विभागली असून पिपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना जाहीर आवाहन करण्यात येते की, मतदारांनी त्यांचे नाव त्यांच्या प्रभागाच्या प्रारूप मतदारयादीमध्ये असल्याची खात्री करावी. केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखानिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या संदर्भातील दुरुस्त्या करणेसाठी व सदर प्रारूप मतदारयादी शुद्ध स्वरुपात व त्रुटीविरहीत होण्याच्या दृष्टीने सदर प्रारुप मतदार यादीवर दिनांक २३ जून २०२२ ते १ जुलै २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळ संपेपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत. सदरील हरकत / सूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्यालय, निवडणूक विभाग, तळ मजला, पिंपरी- १८ अथवा मनपाच्या संबंधित ८ क्षेत्रीय कार्यालयाकडे दाखल करता येतील.
मतदारांकडून प्राप्त होणा-या हरकत सुचनांवर संबंधित प्रगणक / पर्यवेक्षक कर्मचा-यांकडून समक्ष स्थळ पहाणी करून योग्य हरकत सुचनांवर त्वरीत कार्यवाही करणेत येईल.
प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना नवीन नावांचा समावेश करणे, नाव वगळणे इत्यादी स्वरुपाची कामे राज्य निवडणूक आयोगामार्फत केली जात नाहीत. दिनांक ३१ मे २०२२ रोजीच्या विधानसभा मतदार यादीमध्ये ज्यांची नावे आहेत अशा मतदारांनाच महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तरी पिंपरी चिंचवड परिसरातील मतदारांनी कृपया आपले नाव प्रभागाच्या प्रारूप मतदारयादीमध्ये असल्याची खातरजमा करावी असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.