पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि.२२ जुलै रोजी थेरगाव येथे भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे व माजी नगरसेविका मायाताई बारणे यांनी केले आहे.
अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य स्पर्धा आयोजित केली असून शुक्रवार दिनांक २२ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालय येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास २१ हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे १५ हजार, ११ हजार रूपये व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ करिता ७ हजार रुपये, ५ हजार रुपये, ३ हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ २२ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे. यावेळी बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, मावळचे आमदार सुनील शेळके, श्री संत एकनाथ महाराजांचे १४ वी वंशज हभप योगीराज महाराज पैठणकर, युवा कीर्तनकार हभप शेखर महाराज जांभुळकर यांच्या हस्ते होणार आहे.